मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

महाबळेश्वर शहराची निर्मिती कशी झाली? संपूर्ण इतिहास भाग १

क्षेत्र महाबळेश्वरचा रंजक इतिहास (kshetra mahabaleshwar history)

 क्षेत्र महाबळेश्वरचा रंजक इतिहास  (kshetra mahabaleshwar history)

पौराणिक आख्यायिका

क्षेत्र महाबळेश्वर म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे तीर्थक्षेत्र, येते महाराष्ट्राच्या भाग्यविधात्या नदयांचा उगम झाला. क्षेत्र महाबळेश्वर विषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. लेखनाचा मूळ विषय ऐतिहासिक असल्याने पौराणिक आख्यायिकेविषयी येथे फार चर्चा करीत नाही. 


श्री अतिबळेश्वर मंदिर
श्री अतिबळेश्वर मंदिर

       या क्षेत्राच्या उत्पत्तीविषयी एक कथा सांगितली जाते. शैल्यकानादि सृष्टी निर्माणकार ब्रम्हदेव ब्रम्हलोकी तप करीत असता श्री विष्णू देवांनी त्यांस मनुष्यसृष्टी निर्माण करण्याविषय आज्ञा केली. तेव्हा भगवान श्री. विष्णू, श्री. शिव, सरस्वती, कश्यपादि ऋषी यांस समवेत घेऊन ब्रम्हदेव सह्याद्रीच्या मस्तकी आले. त्या नंतर त्रिदेवांनी ब्रम्हतीर्थ, विष्णूतीर्थ आणि रुद्रतीर्थ येथे तपश्चर्या केली. त्या वेळी सृष्टी उत्पन्न करण्याजोगी तपसिध्दी होऊन तपवने निर्माण झाली. त्या नंतर ब्रम्हदेवांनी एक यज्ञ करण्याचे मनात आणून ब्रम्हारण्यात उत्तम प्रकारचा रत्नखचित मंडप उभारून देव ऋषी आणि गंधर्व इत्यादिकास निमंत्रित केले.

         इकडे मुहर्त घटिका जवळ आली. तरी मुख्य यजमान असलेल्या ब्रम्हदेवाची पत्नी सावित्री साजश्रृंगारात व्यस्त राहिल्यामुळे यज्ञास विलंब होऊ लागला. तथापि श्री विष्णू देवांनी सुचविले की आपण आपली व्दितीय पत्नी गायत्री यांच्या समावेत यज्ञदिक्षा घ्यावी. साजश्रृंगार झाल्यानंतर सावित्री तेथे आली. यज्ञ तिच्या विना सुरु झाल्याचे पाहून ती रुष्ठ झाली. त्यावरून तिने सर्वांस शाप दिला " तुम्ही गायत्रीचा पक्षपात केला. 

        त्यामुळे तुम्ही जलरुप होऊन स्त्री नावाने प्रसिध्द व्हाल व गायत्री देखील जलरुप होईल. तिच्याकडे लोक दुर्लक्ष करतील. " हे ऐकून श्री विष्णू देवाने देखील सावित्रीस तू देखील जलरुप होशील हा शाप दिला. त्यानुसार ब्रम्हदेवाला वेण्णा नदी, श्री शिवास कोयना नदी आणि श्री विष्णूस कृष्णा नदी संबोधले गेले. तर गायती आणि सावित्री या त्यांच्याच नावे ओळखल्या गेल्या.

       हे प्रकरण होते न होने तोच नवीन संकट उभे ठाकले. महाबळ आणि अतिबळ हे दोन दैत्य भाऊ यांनी खूप उत्पात मांडला होता. तेव्हा देवांनी त्यांच्या विरुध्द युध्द पुकारले. त्याला अतिबळ श्री विष्णू देवाच्या हातून मारला गेला. पण महाबळ हा अधिकच ताकतवान. त्याच्या पुढे त्रिदेवांचा टिकाव लागेना. त्यामुळे त्रिदेवांनी महामायेस साकडे घातले. तिने मोहास्त्राने महाबळाला काबूत आणले. त्यावर महाबळने त्रिदेवांना विचारले की तुम्हास काय हवे तेव्हा देवांनी तू आमच्या हातून मारला  जावास हा वर मागितला. 

             महाबळने हा वर विचारपूर्वक पंचगंगेच मान्य केला. त्याने स्वतःस मुक्तीपद मागून, श्री. शंकराने लिंगरुप धारण करुन मस्तकी पंच भार आणि माझे नाव धारण करुन येथे वास्तव्य करावे. श्री. विष्णूने माझा भाऊ अतिबळ याचे नाव धारण करुन येथे वास्तव्य करावे. आणि श्री. ब्रम्हदेवाने माझ्या सैन्याचे नाव धारण करुन येथे वास्तल्य करावे. असे वरदान मागितले. 

      देवांनी ही मागणी मान्य केली आणि  महाबळने  आपला प्राण देवांच्या चरणी अर्पण केला. त्यानंतर आरंभलेला यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्यांनतर श्री. शंकराने स्ट्राक्षरूपी लिंगरूप घेऊन महाबळेश्वर नाव धारण केले. श्री. विष्णू देवाने अतिबळेश्वर तर ब्रम्हदेवाने कोटिश्वर हे नाव धारण करून तेथे कायमचे वास्तव्य केले. . 

श्री कोटेश्वर मंदिर
श्री कोटेश्वर मंदिर
  

महाबळेश्वरमधील पाच प्राचीन मंदिरे आणि यादव काळ 

क्षेत्र महाबळेश्वरमध्ये मूळ पाच मंदिरांचा समूह आहे. श्री. महाबळेश्वर, श्री. अतिबळेश्वर, श्री कोटीश्वर, पंचगंगा आणि कृष्णामाई मंदिर. यातील चार मंदिरे ही क्षेत्र महाबळेश्वर गावात असून कृष्णामाईचे मंदिर हे पुर्वेस अगदी कड्यावर बांधण्यात आले आहे. ही मंदिरे स्थापत्यशैलीची अत्यंत उत्तम उदाहरणे आहेत. तेराव्या शतकात महाराष्ट्र, गुजरात प्रांतांवर देवगिरीच्या यादव राजांचे वर्चस्व होते. यांमधील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे राजा सिंघण देव. राजा सिंघणदेवाने इ.स. १२१५ साली श्री क्षेत्र महाबळेश्वरास भेट दिली.

      तेथे आल्यानंतर त्याने कृष्णास्नान करुन श्री. महाबळेश्वराचे दर्शन घेतले. मंदिरे अगदी छोटेखानी आणि दुरावस्थेत होती. त्यामुळे त्याने नव्याने मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडला. यथावकाश सर्व मंदिरे बांधून घेतली आणि देवास अनेक वस्त्रालंकार, आभुषणे, मुखवटे अर्पण केले तसेच मंदिराची व्यवस्था बाबाजी कोळी यांस दिली. कालांतराने या प्रांतावर शिर्के घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. महाबळेश्वर हा प्रदेश तत्कालीन शिरकाणात मोडत असे. शिर्केची सत्ता सध्याच्या रायगडापासून ते पन्हाळ्यापर्यंत विस्तारली होती.

     बहामनी सुलतानांसोबत शिर्केच्या सतत लढाया सुरु होत्या. शिर्केचे वर्चस्व मोडण्यासाठी सन. १४६९ मध्ये बहामनी सुलतानाचा सेनापती महमुद गवान याने शिर्केवर स्वारी केली. मोठ्या प्रतिकारानंतर त्याने रांगणा किल्ला जिंकला. विशालगड, पन्हाळगड ही मुख्य ठाणी गवान ने एकामागून एक ताब्यात घेतली. त्यानंतर मात्र शिर्केनी आपली राजधानी भैरवगड या दुर्गम किल्ल्यावर हलवली. या नंतर गवानने थेट संगमेश्वरावर धडक मारली. सन १४७१ मध्ये गवानने शिर्कान बुडविले. पण जावळीवर अजूनही शिर्केची सत्ता शाबूत होती. गवानला जावळी घेणे शक्य झाले नव्हते.

 जावळीवर मोरे घराण्याची सत्ता आणि महाबळेश्वराचा विकास

          दक्षिणेत नवीन शाहीचा उदय होत होता ती म्हणजे आदिलशाही. यावेळी मोरे घराणे आदिलशहाच्या चाकरीत आले. शिर्केची उर्वरित सत्ता उलथवून टाकण्यासाठी आदिलशहाने परसोजी आणि जयाजी मारेंच्या नेतृत्वात बारा हजाराची फौज देऊन, चंद्रराव हा किताब देऊन नामजद केले. मोरेंनी शिक्यचा पराभव केला आणि बहुतांश भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दरम्यान शिर्के आणि मा मधला संघर्ष सुरु असताना संधी साधून कोयांनी जावळीच्या काही भागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले, 

     शिकैना पराभूत केल्यानंतर मोरे बांधूनी महाबळेश्वराकडे मोर्चा वळविला. प्रथम ते महाबळेश्वराच्या दर्शनास आले. मंदिरात आल्यान देवास त्यांनी नवस बोलला की " कोळवण बुडवून हा प्रदेश आम्हास द्यावा. तसे झाल्यास अर्धामण वजनाचा रुप्याचा (चांदीचा) मुखवटा अर्पण करुन तुझे संस्थान चालविन.

       श्री. महाबळेश्वर मोरेंच्या नवसाला पावला आणि हा प्रदेश कोळ्यांकडून मोरेंच्या हाती आला. आजूबाजूच्या विस्तीर्ण प्रदेशावर आणि कोकण ते रायरीच्या डोंगरापर्यंत मोरेंची सत्ता पसरली. श्री. महाबळेश्वर नवसाला पावल्यानंतर चंद्ररावाने चांदीचा मुखवटा अर्पण केला आणि नवस फेडला. तसेच बाबाजी कोळ्यास पुत्रवत मानून त्यास पुन्हा महाबळेश्वर संस्थानची व्यवस्था सांगितली. 

       चंद्ररावास सहा पुत्र होते. चयाजीराव, यशवंतराव, हणमंतराव, गोविंदराव, बाळाजीराव आणि दौलतराव. आपल्या सहा पुत्रांना चंद्ररावाने आपल्या प्रदेशात विविध गावांची जबाबदारी दिली. या सर्वांनी मिळून मंदिराच्या व्यवस्थेसाठी बोरगाव येथील जमीन, अवकाळी, भोसे येथील माळ आणि गुरेघर हे गाव देवस्थानाच्या व्यवस्थेसाठी इनाम दिले. या मोरे बंधूंनी मिळून पर्वत, चकदेव, घोणसपूर, तळदेव, गाळदेव, धारदेव आणि मोळेश्वर अशा सात शिवपुऱ्या म्हणजेच शिवमंदिरे बांधली.

श्री राजमाता अहिल्याबाई होळकरानी बांधलेले रुद्रेश्वर मंदिर
श्री राजमाता अहिल्याबाई होळकरानी बांधलेले रुद्रेश्वर मंदिर

 चांदीचा मुखवटा आणि पितळी नाग अर्पण

          दौलतरावाने सन १६४४ साली श्री. महाबळेश्वरास पाच फण्यांचा नाग अर्पण केला. हा नाग पितळी असून जवळपास तीस किलो वजनाचा आहे. नागाचे वेटोळे हे काही तुकड्यांमध्ये असून एकमेकाला जोडलेले आहेत आणि गळ्यापासून वरचा भाग हा अखंड घडविण्यात आला आहे हा नाग अत्यंत सुबक आणि सुंदर दिसतो. त्याचे डोळे, जिभ आणि खवल्या हुबेहुब घडविल्या आहेत. 

चांदीचा मुखवटा व पितळी नाग 
      
        या नागाच्या गळ्यावर एक लेख कोरण्यात आलेला आहे. त्यावरुन हा नाग कधी अर्पण केला गेला हे आपणास समजते. तो लेख असा " श्री. शके १५६६ तारण संवत्सरे श्रावण वधी पंचमी सोमे नागार्पणं कृतं शिव पाही " याचा अर्थ शके १५६६ च्या श्रावणवद्य पंचमीला हा नाग शिवास अर्पण केला.होता.दरम्यान महाराष्ट्राच्या पुण्यभुमीवर शिवसूर्य उगवत होता. महाराष्ट्राच्या मर्दानी दैवतानै  जन्म घेतला होता. त्याचे नाव छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्या रुपाने सुलतानी जोखडामध्ये अडकलेला महाराष्ट्र स्वातंत्र्याचा श्वास घेऊ लागला.

 छत्रपती शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक जावळी मोहीम 

         छत्रपती शिवरायांनी स्वराज्य संस्थापून महाराष्ट्र भूमी मुक्त करण्याचा सपाटा लावला होता. याच दरम्यान जावळीस चंद्रराव असलेल्या दौलतरावाचे सन १६४८ मध्ये निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याची आई माणकाईने दत्तक घेण्याचे ठरविले. * या कामी तिने नातलगांचा विरोध लक्षात घेता शिवरायांना साकडे घातले आणि मदत मागितली. वास्तविक चंद्रराव मोरे हे आदिलशहाचे चाकर. पण पुढे जाऊन मोऱ्यांची स्वराज्यकामी मदतच होईल या हेतूने शिवरायांनी माणकाईस मदत केली आणि कृष्णाजी बाजी यास चंद्रराव केले.

          कालांतराने या चंद्ररावास शिवरायांनी केलेल्या मदतीचा विसर पडला आणि तो महाराजांसोबत उद्दामपणाने वागू लागला. त्याने स्वराज्याविरोधात देखील अनेक कारवाया आरंभल्या. बिरवाडी येथील काही गावांचा अधिकार हा बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्याला हुसकावून लावत त्यांचे वतन बळकावले. यावेळी पाटलांनी शिवाजी महाराजांकडे मदत मागितली. तसेच चिखली येथील रामाजी वाडकर यांच्या सोबत चंद्ररावाचे पूर्वी पासूनच वैर होते. 

        या वैराची परिसीमा इतकी वाढली की त्याने रामाजी वाडकराची हत्या करुन त्याचा मुलगा लुमाजी वाडकर याची स्वराज्य हद्दीत घुसून रोहिड खोऱ्यात हत्या केली. त्याने सर्वोच्च गुन्हा केला तो म्हणजे, मुसेखोऱ्याचा गाव कुलकर्णी रंगो त्रिमल वाकडा याने त्याच्या गावातील एका विधवा स्त्रीचा बदअमंल केला. हे शिवाजी महाराजांना समजताच त्यांनी वाकडाच्या अटकेचे आदेश दिले. त्यास भिवून रंगोजी वाकडा मोऱ्यांच्या आश्रयास आला. चंद्ररावाने त्यास अभय देऊन त्यांची उत्तम बढदास्त ठेवली. त्यामुळे महाराज संतप्त झाले.

      या सर्व घडामोडीनंतर महाराजांनी चंद्ररावास खरमरीत पत्र पाठविले. " तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता राजे आम्ही आम्हास श्री. शंभूने राज्य दिधले तरी तुम्ही राजे न म्हणविता आमचे नोकर होऊन आपला मुलूख खाऊन हमराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करुन फंद कराल तर जावळीस मारुन तुम्हास कैद करुन ठेऊ. " महाराजांचे खरमरीत पत्र आले तरी चंद्ररावाचा उध्दटपणा काही सुटला नाही. त्याने महाराजांस उलट पत्र लिहले. " तुम्ही काल राजे झाला तुम्हास राज्य कुणी दिधले मुस्तफद राजा आपले घरी म्हणल्यावर कोण मानितो. येता जावळी जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. 

       तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदईक याल तर आजच यावे आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री. महाबळेश्वर. त्याच्या कृपेवरुन आम्ही राज्य करितो. आम्हा श्री. चे कृपेने पातशाहने राजे किताब, मोर्चेल, सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दरपिढी राज्य जावळीचे करितो. तुम्ही आम्हास खटखट कराल तर पष्ट समजून करणे. यश न येता अपयशास पात्र होऊन जाल. " असे चंद्रराव मोरे याने उद्धट उत्तर दिले. असे उध्दट पत्र येताच महाराज चिडले आणि चंद्ररावास खरमरीत पत्र पाठविले

          जावळी खाली करुन, राजे न म्हणून, मोर्चेल दूर करुन, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन,हजूरची काही चाकरी करणे. इतक्यावरी बदफैली केलिया, मारले जाल. "महाराजांचे पत्र वाचून सुधारेल तो चंद्रराव कसला. त्याने परत महाराजांना उध्दट उत्तर दिले. " दारु गोळा महजूद आहे. काही बेजबबास खुते घालून लिहिले ते कसियास लिहावे थोर समर्थ त्यानंतर मात्र जावळी मारल्या शिवाय राज्य साधत नाही हे महाराजांनी ओळखले आणि जावळी मारण्याचे निश्चित केले. 

          इकडे महाराजांसोबत बिघाड होताच मोरे मंडळींनी जाणले कीप्रसंग कठीण आहे. ठीक नाही.तेव्हा आपली चिजवस्तू श्री क्षेत्री (महाबळेश्वर) आणली आणि श्रींचे जामदारखान्यात ठेवली व मुखवटा भवानी शंकराचा होता तो बाळाजीराव यांनी श्री. चे देवळी देवाजवळ ठेवला.” मोरे मंडळींनी आपला संपूर्ण खजिना श्री. क्षेत्र महाबळेश्वरास हलविला. त्यांनी मौल्यवान दागदागिने जामदार खान्यात ठेवलेच, सोबत आपले शिक्के, कट्यार,मोर्तब व रुमाल देखील देवापुढे ठेवले. जामदारखान्यास कुलूप लावून त्याची किल्ली बाबाजी कोळीचा मुलगा कानोजी कोळी याच्या हाती दिली आणि जतन कर असे सांगितले.

        त्या दरम्यान महाराजांनी जावळी मारण्याची योजना आखली. प्रथम सोयरिकेच्या निमित्ताने आपले विश्वासू संभाजी कावजी आणि रघुनाथ बल्लाळ यांस काही माणसांनिशी जोर येथे उतरविले. या वेळी दोघांनी मोऱ्यांचा प्रमुख सेनापती हनमंत मोरे यास मारले आणि जोर काबिज केले यानंतर खुद्द महाराज निसणीच्या वाटेने जावळीत उतरले. महाराज येताच चंद्रराव जावळी सोडून रायरीस पळून गेला. जावळीत चंद्रराव जरी नसला तरी महाराजांना जोरदार प्रतिकार झाला. तो मोडण्यास आणि जावळी सर्व ठिकाणी ताब्यात घेऊन त्याची व्यवस्था लावण्यास महाराजांना एक महिना लागला. 

         त्यानंतर महाराजांनी आपला मोर्चा रायरीस वळविला आणि वेढा टाकला. दोन महिने व्ढा पडल्यानंतर चंद्ररावास तह करुन शरण येणे भाग पडले. त्याने शिळीमकर देशमुखांच्या मध्यस्थीने महाराजांसोबत तह केला. महाराज जावळीतून निघून जाताच चंद्ररावाने पळून जाण्याचा कट आखला. फितूरचा पत्रव्यवहार महाराजांच्या हाती लागला. त्यानंतर मात्र महाराजांनी चंद्ररावाचा शिरच्छेद केला आणि जावळी खालसा केली.

       जावळीच्या युध्दात महाराजांना विजयश्री मिळालीच. सोबत रायरी (रायगड) सारखा किल्ला स्वराज्यास मिळाला. तसेच महाबळेश्वराच्या समोरच डोंगररांगेपासून वेगळा असलेला. रानआडवा, भोरप्या, ढोरप्या, गौंड अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगराकडे जाणत्या गडपतीचे लक्ष गेले. पाहताक्षणी त्यांनी या डोंगरावर दुर्ग बांधणीची आज्ञा अजजी यादवांना दिली आणि तिथे भव्य असा प्रतापगड निर्माण केला. 

          सोबतच मकरंदगड, मोहनगड, चंद्रगड हे किल्ले मजबूत करुन घेतले या युध्दातच किल्यासारखा एक मजबूत वीर योध्दा महाराजांना गवसला. त्याचे नाव मुरारबाजी देशपांडे.दरम्यान विजापूरचा आदिलशहा गंभीर आजारी पडून मेला. त्याच्या नंतर त्याचा मुलगा अली आदिलशहा गादीवर आला. कारभार मात्र त्याची आई बडीबेगम करीत होती. महाराजांनी जावळी घेतली आणि अनेक प्रदेश काबिज करत असल्याच्या बातम्या रोज विजापूरास धडकत होत्या. 

       त्यामुळे बडीबेगमने चाळीस हजारांची फौज देऊन विजापूर दरबारचा क्रूर सेनापती अफजलखानास स्वराज्यावर पाठविले. पण महाराजांनी बुध्दीचातुर्याने अफजलखानाचा कोथळा काढला आणि त्याची सर्व फौज गर्दीस मिळवली. या युध्दानंतर महाराजांना अमाप धनसंपत्ती प्राप्त झाली. या वेळी अफजलखानाच्या तंबूचे सोन्याचा मुलामा दिलेले कळस कापून आणले आणि ते श्री.देवास अर्पण केले.

जिजाऊ साहेबांची सुवर्णतुला - एक मातृभक्तीचा सोहळा 

        यानंतर मात्र जावळी खोऱ्याचे भाग्य पालटले. महाराजांनी प्रतापगडावर श्री. तुळजाभवानीची स्थापना केली. स्वराज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर सन १६६५ मधील सुर्य ग्रहणादिवशी दानधर्म करावे असा संकल्प जिजामातांच्या मनी आला. आपल्या मातेची इच्छा पूर्ण करावी या हेतूने महाराज सर्व कुटुंबानिशी क्षेत्र महाबळेश्वर क्षेत्री आले.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातृभक्तीतून सूर्य ग्रहणादिवशी म्हणजेच ६ जानेवारी १६६५ रोजी जिजाऊ साहेबांची सुवर्णतुला केली. हा मातृभक्तीचा अभुतपूर्व सोहळा पाहण्यासाठी श्री महाबळेश्वर मंदिराच्या प्रांगणात गर्दी लोटली होती.

       महाराजांनी जिजाऊसाहेबांची सुवर्णतुला करुन ते सोने दान केले. सोबतच स्वराज्याच्या उभारणीत अतिशय महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या सोनोपंत डबीरांची देखील सुवर्णतुला केली. पंचगंगेच्या आणि श्री महाबळेश्वराच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.

Panchganga Temple and the inner water tank
पंचगंगा मंदिर व आतील कुंड

मराठा स्वातंत्र्ययुद्ध आणि छत्रपती शाहू महाराज  

 पुढील काळात जावळीच्या भागात फारशा घटना घडल्या नाहीत. शिवरायांच्या निधनानंतर संभाजी महाराजांच्या काळातही येथे फारशा घटना घडल्याचे कागदोपत्री उल्लेख आढळत नाहीत. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मोघल सरदार इतिकाद खानाने रायगडास वेढा टाकला. यावेळी संपूर्ण राजपरिवार रायगडावरच होता. सगळेजण एकत्रित शत्रूच्या तावडीत सापडलो तर क्षणात स्वराज्य बुडेल. हा विचार, शिवरायांचे हे राज्य राखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणाऱ्या महाराणी येसुबाईंच्या मनात आला. या नंतर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपले चिरंजीव बाल शिवाजीराजे (शाहूराजे) यांना गादीवर न बसवता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले. यानंतर विचारांती त्यांना वाघ दरवाज्यातून बाहेर काढून दक्षिणेत निसटून जाऊन स्वराज्य राखण्यास सांगितले. 

          या प्रमाणे राजारामराजे रायगडावरुन बाहेर पडले आणि प्रथम प्रतापगडावर आले. येथे तीन महिने राहून राजाराम महाराजांनी पुढील योजना आखल्या. पाठलागावर असलेल्या शत्रूमुळे ते जिंजीस निघून गेले. त्यानंतर हा गड मोघलांच्या ताब्यात आला. सन १६९१ मध्ये मराठ्यांनी प्रतापगड पुन्हा जिंकून घेतला. आठ वर्षांनी राजारामराजे पुन्हा एकदा स्वराज्यात दाखल झाले. प्रथम त्यांनी प्रतापगडावर आई भवानीचे दर्शन घेतले.

           त्यांनी आपले धाकटे पुत्र संभाजीराजे  यांचे जावळ काढण्याचे विधी प्रतापगडावरच केले. त्या नंतर अवघ्या काही महिन्यातच दिनांक ३० मार्च १७०० रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांचे निधन झाले. त्यांनतर महाराणी ताराबाई यांनी आपले पुत्र शिवाजीराजे यांना गादीवर बसवून स्वराज्यात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबास सात वर्ष अक्षरशः घाम फोडला. सन १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यू नंतर त्यांच्या पुत्रांमध्ये गादीवरुन चढाओढ सुरु झाली. 

        दक्षिणेत असलेल्या औरंगजेबाचा पुत्र आझमशहा यास दिल्लीस जाणे क्रमप्राप्त होते. पण आपण दिल्लीस जाताच मराठे पुन्हा उचल खातील यास्तव त्याने कैदेत असलेल्या शाहराजांची सुटका केली. पण येसुबाई आणि इतर राजपरिवारास कैदेतच ठेऊन दिल्लीस घेऊन गेला. या सर्वामागे त्याचा हेतू असा होता की मराठ्यांमध्ये वर्चस्वावरुन गृह युध्द पेटेल आणि आपला मार्ग मोकळा होईल.

           सुटका होताच शाहूराजांनी स्वराज्यावर हक्क सांगितला आणि साताऱ्याच्या दिशेने कूच केले. महाराणी ताराबाईंनी त्यांस तोतया ठरवून त्यांचा स्वराज्यावरील दावा नाकारला. प्रसंगी युध्द पुकारले. दरम्यान अनेक सरदार फौजेनिशी शाहूमहाराजांना सामिल होत होते. दिवसेंदिवस शाहूराजांची ताकत वाढत चालली होती. ताराबाईंनी धनाजी जाधवरावांच्या नेतृत्वात शाहराजेंवर सैन्य पाठवले. पण ऐनवेळी शाहूराजांची बाजू पटल्यामुळे धनाजी जाधवराव शाहू राजांना सामिल झाले. उरलेल्या ताराबाईंच्या फौजेचा पराभव झाला आणि शाहू महाराजांनी साताऱ्यात येऊन राज्य ताब्यात घेतले. 

        दिनांक १२ जानेवारी १७०८ रोजी साताऱ्याच्या किल्ल्यावर शाहराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि शाहू महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. त्यांतर शाहू राजांचे राज्य बळकट होऊन भारतभर पसरले. शाहू राजांची ताकत इतकी वाढली की दिल्लीमध्ये बादशहा कोण होणार हे ते साताऱ्यात राहून ठरवत होते.

शाहू महाराजांनी केलेला मंदिरांचा जीर्णोद्धार

 शाहू महाराज वेळोवेळी प्रतापगडी आईभवानीच्या दर्शनास येत तसेच क्षेत्र महाबळेश्वरासही येत. शाहू महाराज प्रथम जेव्हा क्षेत्रमहाबळेश्वरास दर्शनास आले त्यावेळी त्यांनी कृष्णास्नान करुन श्री. महाबळेश्वराचे दर्शन घेतले. त्या वेळी कान्होजी कोळीचा पुत्र सुर्याजी कोळी तेथे उपस्थित होता. 

           त्यास शाहू महाराजांनी तेथील सर्व व्यवस्थेबाबत तसेच चंद्रराव मोरेंनी येथे जो ऐवज लपवला होता तो कोठे आहे हे विचारले. त्यानुसार सुर्याजी कोळीने तेथील सर्व ऐवज जामदार खान्यातून आणून महाराजांस दाखवला. तो पाहिल्यानंतर शाहू महाराजांनी हा ऐवज आहे असाच श्रींच्या जामदारखान्यात जतन करण्यास सांगितले आणि जेव्हा कधी चौकशी करु तेव्हा आणून दाखवण्यास सांगितले. त्यांनी त्या क्षेत्राची व्यवस्था ही सुर्याजी कोळीकडे सुरु ठेवली. अनेक वर्षांच्या पातशाही आक्रमणामुळे या मंदिरांची फार दुरावस्था झाली होती. 

        शाहू महाराजांनी तातडीने मंदिरे दुरुस्त करण्याचे आदेश दिले आणि व्यवस्थेसाठी पुर्वापार चालत आलेली गावे कायम केली. तसेच आपल्या वतीने बोरगाव इनाम दिले. शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपतींची सत्ता पेशव्यांच्या हाती गेली आणि छत्रपतींना साताऱ्यात नजर कैदेत रहावे लागले. त्यामुळे छत्रपती रामराजे, छत्रपती शाहूराजे (दुसरे), यांचे या भागात येणे झाले नाहीकिंवा तशा नोंदी आढळत नाहीत. 

पेशवेकालीन महाबळेश्वर 

       दरम्यान पेशव्यांच्या घराण्यातून एकमेव सवाईमाधवराव श्री क्षेत्र महाबळेश्वरास दर्शनास आल्याचे उल्लेख आढळतात. पेशवे दप्तरात या विषयी सवाई माधवरावांनी क्षेत्र महाबळेश्वरी येऊन दानधर्म केल्याची नोंद आढळ - ते. १४ आक्टोंबर १७९१ रोजीच्या नोंदीत पेशव्यांनी महाबळेश्वर येथे १७ रुपये दान केल्याचे आढळते. या भेटीत चार्लस मॅलेट हा ब्रिटीश रेसिडेंट पेशव्यांच्या सोबत येथे आला होता. रेसिडेंट सोबत असलेला लष्करी अधिकारी मेजर प्राईस यांनी या विषयी नोदीं करुन ठेवल्या आहेत.

जाणून घ्या 

क्षेत्र महाबळेश्वरमधील प्रमुख मंदिरे